जबरी चोरी करणाऱ्या तिघांना डोंबिवली पोलिसांनी केले जेरबंद…

dombivali – जबरी चोरी करणाऱ्या तिघांना (आंतरराज्यीय टोळी) डोंबिवली पोलिसांनी अटक करून ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अभय गुप्ता, अभिषेक जौहरी आणि अर्पीत उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला अशी या तिघांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, १० फिट रोड, ठाकुर्ली डोंबिवली पूर्व येथून एक वृध्द महिला पायी चालत जात असताना दोन इसमांनी मोटार सायकलवर येऊन या वृध्द महिलेच्या गळयातील चैन खेचून घेऊन पळून गेले असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे डोंबिवली पूर्वेतील सुनील नगर परिसरातून सदर तिघांना अटक केली. सदर प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून १ देशी बनावटीचा गावठी कट्टा, ४ जिवंत काडतुसे, ४.१४ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, २३.८९ सोन्याचे मंगळसूत्र, मोटार सायकल असा एकूण ३,८०,४२० रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, त्यांच्याविरुद्ध ठाणे, पुणे आणि उत्तर प्रदेश येथील विविध पोलीस ठाण्यात एकूण १० गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.