नवरात्रीचे महात्म्य आणि स्त्रीशक्ती!…

शारदीय नवरात्रीत स्त्री शक्तीचे पूजन केले जाते. माणसाला जीवन जगताना भौतिक सुख मिळवायचे असते परंतु भौतिक सुख मिळवत असताना, आध्यात्मिक सुख, समाधान मिळवणे हे देखील महत्त्वाचे असते. त्याशिवाय जीवन परिपूर्ण होत नाही. म्हणून या नऊ दिवसात शक्तीचे पूजन होत असते. आपल्या सर्वांना हे माहित आहे, या विश्वात प्राणिमात्रांची निर्मिती स्त्रीशक्तीमुळे झाली आहे. म्हणून स्त्रीला आपण जगत जननी म्हणतो. यामुळे शारदीय नवरात्रीत देवीच्या स्त्रीशक्तीचे पूजन करण्याचा हिंदू धर्म संस्कृत रिवाज आहे. ही नवरात्र आश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला सुरू होते आणि दहा दिवसानंतर विजयादशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी समाप्त होते. यंदाच्या वर्षी शारदीय नवरात्र २२ सप्टेंबरला सुरू होऊन २ ऑक्टोबरला समाप्त होणार आहे.
नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसात महाकालीचे म्हणजे तम गुणाचे पूजन होते. मधल्या तीन दिवसात महालक्ष्मीचे म्हणजे रज गुणाचे पूजन होते. शेवटच्या तीन दिवसात महासरस्वतीचे म्हणजे सत्व गुणाचे पूजन केले जाते. अशी ही नवरात्र देवीच्या साधनेची असते. या दिवसात शेतात पिकाची निर्मिती होत असते. त्यामुळे हा नवसृजनाचा उत्सव आहे. या नऊ दिवसात प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या देवी रूपाची पूजा होत असते. यात पहिल्या दिवशी शैलपुत्री पूजन, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कूष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्री,आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्रीच्या पूजेचा दिवस असतो अशा प्रकारे देवींची आराधना करण्यात येते.
या नऊ दिवसात देवीचे भक्त देवीला प्रसन्न करण्याकरता उपवास करत असतात. काही भक्त संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात, त्यावेळी ते फक्त फळ आहार घेतात. काहीजण नऊ दिवस दिवसभर उपवास करून, रात्रीच्या वेळी भोजन करतात तर काहीजण पहिल्या दिवशी उपवास करतात, तो उपवास रात्री सोडल्यावर शेवटच्या दिवशी उपवास करतात. अशा प्रकारच्या उपवासमुळे पदोपदी मनात देवीचे स्मरण राहते. या नऊ दिवसात देवीच्या पूजानाला महत्त्व आहे. उपवास त्या कारणाने सांगितला गेला आहे. या पूजनात घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते त्यातून घरात चैतन्यमय ऊर्जा नांदते आणि देवीचा आशीर्वाद भक्तांना प्राप्त होतो.
या नऊ दिवसात पारंपारिक गरबा खेळला जोतो. स्त्री – पुरुष तालासुरावर गोल फिरत एकमेकींना टाळ्या देतात. काही ठिकाणी छोट्या काट्यांचा वापर करून दांडीया खेळला जातो. महाराष्ट्राच्या गावागावात मुली हत्ती नक्षत्र भोंडला खेळतात. शारदीय नवरात्रीचे हे पूजन केल्याने शरीर, मन, आत्मचैतन्य शुद्ध होते. मनोकामनांची पूर्ती करून समस्यांवर मात करण्याचे आत्मबळ भक्तांमध्ये येते. अशी धारणा ह्या सण उत्सवा मागे आहे. पश्चिम बंगालमध्ये नवरात्र उत्सवाला दुर्गा उत्सव असे म्हणतात. या सण उत्सवात प्रत्येक दिवसाचे वेगळे रंग असतात. यंदा अनुक्रमे हे रंग असे आहेत. पहिला दिवस पांढरा रंग, दुसरा दिवस लाल रंग, तिसरा दिवस निळा रंग, चौथा दिवस पिवळा रंग, पाचवा दिवस हिरवा रंग, सहावा दिवस राखाडी रंग, सतवा दिवस केशरी रंग, आठवा दिवस मोरपंखी रंग, नऊवा दिवस गुलाबी रंग हे आहेत. अशा प्रकारे प्रेम, जिव्हाळा, भक्ती, खेळ, समरसता, दानधर्म, ग्रंथवाचन, देवी दर्शन ह्या सर्वातून हे स्त्रीशक्तीचे पूजन होते. असा हा नवसृजनाचा स्त्रीशक्ती उत्सव आहे.