शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात…

mumbai – महाराष्ट्रात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. येत्या २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. यंदा तिथीची वृद्धी झाल्यामुळे नवरात्र दहा दिवसांची आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा-आराधना व सेवा केली जाते. नऊ दिवस उपवासही केला जातो.
घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा मुंबई, ठाणे, पुणे, धाराशिव, नांदेड, कोल्हापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शहर, गावांमध्ये जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळणार आहे. घरोघरी घटस्थापना करण्यात येणार आहे तर अनेक दुर्गादेवी मंडळे देवीच्या उत्सवासाठी सज्ज झाले आहेत. आजपासून नऊ दिवस देवीची पूजा, आरती, भजन, गोंधळ, भोंडला, गरबा, दांडिया असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

५१ शक्ती पीठांपैकी साडेतीन शक्तीपीठं महाराष्ट्रात आहेत यात तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, नांदेड जिल्हातल्या माहुरचं रेणुका माता मंदिर तसंच वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी नवरात्र महोत्सवापूर्वीची मंचकी निद्रा संपवून देवी पहाटे सव्वादोन वाजता वाजतगाजत सिंहासनावर विराजमान झाली आहे. दुपारी १२ वाजता सिंहासन गाभाऱ्यामध्ये घटस्थापना करण्यात आली. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध पूजा मांडण्यात येणार आहेत. त्यापैकी भवानी तलवार अलंकार महापूजा भाविकांसाठी असणार विशेष आहे.