६५ अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश…

mumbai – कल्याण-डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासक आणि त्यांच्याशी संलग्न असलेले सर्व व्यवहारांचा तपास करून यातील सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच या प्रकरणात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार करून गुन्हे दाखल करावे असे निर्देश शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांना दिले.
कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६५ अनधिकृत इमारतींच्या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृह येथे विशेष बैठक पार पडली. बैठकीत अनधिकृत बांधकाम प्रकरणातील नागरिकांना न्यायलायीन निर्णयाच्या अधीन राहून कशा पद्धतीने दिलासा देता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच भविष्यात या पद्धतीने पुन्हा इतर नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी योग्य पद्धतीने जनजागृती करावी, जनजागृती करणारे फलक शहरात जागोजागी लावावे, पालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावरून नियमित स्वरूपात अधिकृत इमारतीची यादी प्रसिद्ध करावी असेही यावेळी सुचवले.