पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकाच्या कमरेत घातली लाथ…

mumbai – स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या एका आंदोलनकर्त्याच्या कमरेत जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अनंत कुलकर्णी यांनी धावत जाऊन लाथ घातली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील एका व्यक्तीच्या पत्नीने परस्पर दुसरे लग्न केले. या व्यक्तीने यासंदर्भात पोलिसांशी संपर्क साधला. पण पोलिसांकडून काहीच मदत मिळत नसल्याने न्याय मिळवण्यासाठी अमित चौधरी आणि गोपाल चौधरी हे दोघे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंकजा मुंडे या जालन्यात आल्या होत्या त्यावेळी या आंदोलनकर्त्यांनी मुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यांना घेऊन जात असताना जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अनंत कुलकर्णी यांनी धावत जाऊन आंदोलकाच्या कमरेत लाथ घातली.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याच्या या कृतीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.