कचोरेतील टेकडीवर महापालिकेच्या तत्परतेमुळे टळला मोठा अनर्थ…

kalyan – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या फ प्रभाग क्षेत्रातील कचोरे गावात उतारावर वसलेली एक अनधिकृत चाळ ढासळण्याच्या स्थितीत असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच तत्काळ कारवाई करण्यात आली. सहा खोल्यांची ही चाळ पूर्णपणे अनधिकृत असून संरक्षक भिंत खचल्यामुळे चाळीखालील जमीन खचू लागली होती.

या चाळीला महापालिकेने जून महिन्यातच नोटीस दिल्या होत्या. सदर संपूर्ण चाळ निर्मनुष्य करण्याची कारवाई ६/फ प्रभागामार्फत करण्यात आली. माती खचण्याची प्रक्रिया दिसताच महापालिकेच्या ६/फ विभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आपल्या पथकाच्या व नागरिकांच्या मदतीने सहा खोल्यांच्या रिकाम्या चाळीवर निष्कासनाची तोडक कारवाई केली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
यावेळी महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आलेला आहे. सहाय्यक आयुक्त फ प्रभाग यांच्या मार्फत चाळ मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती ६/फ प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली आहे.
महापालिकेने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार मानत पावसाळ्यात टेकडीवरील धोकादायक घरे त्वरित रिकामी करण्याचे आवाहन केले आहे.