मंत्रालय, नाशिक, ठाणे हनीट्रॅपचं केंद्र – नाना पटोले…

mumbai – काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅप प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असूनही राज्याचे मंत्री याबाबत सभागृहात उभे राहून उत्तरही देत नाहीत, ना निवेदन करत आहेत असे नाना पटोले यांनी म्हण्टले आहे.
हनीट्रॅपच्या माध्यमातून राज्यातील गोपनीय शासकीय कागदपत्रे आणि माहिती राज्याबाहेर लीक होत आहे, यामध्ये काही IAS अधिकारी तसेच मंत्री सहभागी असल्याचा पटोले यांनी दावा केला आहे. माझ्याजवळ एक पेनड्राईव्हही आहे, मला ते दाखवून कोणाचे चरित्रहनन करायचे नाही. पण एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधे निवेदनही करत नाहीत. या राज्यात नेमके काय सुरु आहे? हेच आम्हाला कळत नाही आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, या संदर्भात नाना पटोले यांनी एक्स पोस्ट देखील केली आहे. त्यात त्यांनी असे म्हण्टले आहे कि, काल अधिवेशनात मी महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला होता. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात असून राज्याची प्रतिमा मलिन होते आहे. एवढी गंभीर बाब असूनही सरकार यावर साधं निवेदन द्यायला सुद्धा तयार नाही, हे अत्यंत धक्कादायक आहे.
तसेच या आधी सदनात मी रेशनिंग व्यवस्थेतील भेसळीवर उपस्थित केला. गोरगरीब जनतेला दिला जाणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा आहे, याशिवाय रेशनिंग दुकानांवर बसवण्यात आलेली मशीनसुद्धा बोगस असल्याचे दिसून आले आहे. गरिबांच्या तोंडचा घास हिसकावला जात आहे, आणि यावर सरकारकडून कोणतीही ठोस माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सरकारची ही उदासीनता अत्यंत चिंताजनक आहे. हनीट्रॅपसारख्या गंभीर सुरक्षाविषयक प्रकरणावर मौन, आणि रेशनमधील भेसळीवर कारवाईचा अभाव, या सगळ्यामुळे एकच प्रश्न निर्माण होतो, की या राज्यात नेमकं चाललंय काय? राज्याच्या सुरक्षेचे प्रश्न असोत किंवा गरिबांचं जीवनमान सरकारने हे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत. अशा विविध मुद्द्यांवरून नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.