कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा – राज ठाकरे…

mumbai – कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज्य शासनाने हिंदी सक्ती रद्द केल्याच्या निमित्ताने मुंबई येथे आयोजित विजयी मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.
सन्माननीय उद्धव ठाकरे अशी भाषणाला सुरवात करत राज ठाकरे म्हणाले, खरं तर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस कसा एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं. पण, नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरंतर आजचाही मेळावा शिवतीर्थावरती मैदानात व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण पाऊस आहे. अशा प्रकारच्या जागा मिळत नाहीत मुंबईमध्ये. म्हणून तुम्हा सर्वांना इथे यावं लागलं. बाहेर जे उभे आहेत त्यांना मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना आतमध्ये यायला नाही मिळालं.
पुढे ते म्हणाले, ‘मी एका मुलाखतीत म्हंटलं होतं, जिथून या सगळया गोष्टी सुरू झाल्या. कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हा दोघांना एकत्र आणायचं ते ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. आता बरेच चॅनलचे कॅमेरे सगळीकडे लागलेत. सगळं सुरू होईल आता. काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं का? जास्त हसलं का? कोणी बोलतायत का? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टीतच अनेकांना रस असतो.