हिंजवडी बस आग प्रकरण; चालकानेच बस पेटवली…

pune – पुण्यातील हिंजवडीमध्ये व्योम ग्राफिक्स या आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला (टेम्पो) बुधवारी आग लागली होती. या आगीत ४ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले. दरम्यान, याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिवाळीचा पगार न दिल्याने बस चालकानेच हि ट्रॅव्हल्स पेटवली होती.
मिळालेल्या माहितीनुसार. बस चालकाचे नाव जनार्दन हंबर्डीकर असे असून, कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून जनार्दनने बस पेटवून दिली. जनार्दनने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला. फेज एक मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता.
हि घटना घडवून आणण्यासाठी जनार्दनने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या. हिंजवडी जवळ आल्यावर त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या आणि केमिकल मुळे बस मध्ये आगीचा भडका उडाला आणि या आगीत ४ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले.