KDMC हद्दीत अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन सुरुच – दीपेश म्हात्रे…

dombivali – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील ६५ अनधिकृत बांधकामाचे प्रकरण ताजे असतानाच अजूनही अनधिकृत बांधकाम सदनिका नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.
२३ जानेवारी २०२५ ला आयरे गावातील साई गॅलेक्सी इमारतीत एका सदनिकेचे रजिस्ट्रेशन झाले आहे. याची सखोल चौकशी करून शासन व नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासंबंधीचे निवेदन दीपेश म्हात्रे यांनी कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना पुराव्यासह दिले आहे.

सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रेरा नोंदणी घोटाळ्यातील ६५ अनधिकृत बांधकामाचा प्रश्न चर्चेत आहे. या इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यातील ४७ इमारतीत नागरिक पूर्णपणे वास्तव्यास आले असून त्यांची फसगत झाल्याने ते रस्त्यावर आले आहेत. सुमारे साडे सहा हजार नागरिक यामुळे बेघर होणार आहेत. तरीदेखील साई गॅलेक्सी या इमारतीमधील एका फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले इतकेच नव्हे तर गेल्या दोन महिन्यापासून डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामाचे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे सुरू असल्याचे म्हात्रे म्हणाले. ६५ बेकायदा इमारत प्रकरणातील मागचा जे आका आहे त्याला शोधा अशी मागणी यावेळी म्हात्रे यांनी केली.
तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात काही अनधिकृत बांधकामातील घरांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. गँग्स ऑफ डोंबिवली या मागे आहे. कागदपत्र तयार करणारे मोठे स्कॅमर आहे. या प्रकरणाचा तपास डीसीपींनी करावा या प्रकरणी पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे. ज्या लोकांच्या विरोधात या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. तेच लोक या रजिस्ट्रेशन घोटाळ्यात आहेत’, असे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
आजही रजिस्ट्रेशन कार्यालयात अधिकृत इमारतीचे पेपर लावून अनधिकृत इमारतीमधील घरांचे रजिस्ट्रेशन सुरु आहे. रजिस्टेशन करण्यासाठी तीन लाख रुपये घेतले जात आहेत. त्याच्या मागे कोण आहे. त्याचा तपास डीपीसींनी करावा. त्यासाठी एसआयटी नेमावी. या संदर्भात जे पुरावे आहेत ते सादर केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.