दहावी-बारावी परीक्षेत कॉपी कराल तर…

mumbai – १० वी आणि १२ वी च्या परीक्षेत कॉपी कराल तर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे.
याबाबत मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, परीक्षांमध्ये कॉपी करताना पकडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी मंडळ कडक उपाययोजना राबवत आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षांमध्ये प्रामाणिकपणे सहभाग घ्यावा आणि नियमांचे पालन करावे.
परीक्षेत कॉपी करताना किंवा विद्यार्थ्यांना मदत करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता शांतपणे आणि प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी असेही गोसावी म्हणाले.
तसेच परीक्षेसाठी विद्यार्थी हॉल तिकीट विसरल्यास घाबरण्याचे कारण नाही, हॉल तिकीट नसेल तर विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल, मात्र त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल. पुढील दिवशी मात्र हॉल तिकीट आणणे अनिवार्य आहे. तसेच, परीक्षेसाठी वेशभूषेवर कोणतेही बंधन नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.