डेक्कन क्वीन दोन, तर प्रगती सहा दिवस रद्द…

मुंबई – प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे डेक्कन क्वीन दोन दिवसांसाठी तर प्रगती एक्सप्रेस सहा दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. तर शुक्रवारी १७ मे पासून काही गाड्या सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सीएसएमटीवर विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. १७ मे ते २७ मे पर्यंत काही गाड्या दादरपर्यंतच धावणार आहेत. तिथूनच त्या गाड्या परतीचा प्रवास करतील. यात पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेसचाही समावेश असणार आहे.
रद्द झालेल्या गाड्या…
पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस २८ मे ते २ जून या कालावधीत रद्द केली आहे. तर पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस ३१ मे ते २ जूनपर्यंत रद्द करण्यात आलीय. डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि कुर्ला-मडगाव-कुर्ला या गाड्या १ ते २ जून दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
दादरपर्यंत धावणाऱ्या गाड्या
अनेक गाड्या सीएसएमटीऐवजी दादरपर्यंतच धावतील. यात मुंबई-चेन्नई एक्सप्रेस, हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्सप्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस, होस्पेट-मुंबई-होस्पेट एक्सप्रेस या गाड्या १७ मे पासून दादरपर्यंत धावतील.