वेगवेगळ्या स्कीमचे आमिष दाखवून १५० हुन अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक…

डोंबिवली – वेगवेगळ्या स्कीमचे आमिष दाखवून १५० हुन अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, सदर प्रकरणी राम नगर पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली आहे. विनय पुरुषोत्तम वर्टी असे याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, डोंबिवली पूर्वेला विनय पुरुषोत्तम वर्टी यांचे युनिक कन्सल्टन्सी आहे. विनय यांनी फिर्यादी प्रतिक महेंद्र भानुशाली आणि इतर काही लोकांना युनिक कन्सल्टन्सी या कंपनीमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून सदर पैसे शेअरमार्केट मध्ये गुंतवणुक करून गुंतवलेल्या रक्कमेबर १० टक्के परतावा देतो व एक वर्षांत तुमचे गुंतवलेले पैसे डबल करून व सोने देतो. कमी कालावधीत जास्त नफा/परतावा व सोने मिळून देतो अशा वेगवेगळ्या स्किमचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करून पैशाचा अपहार केला असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाणे गुरजि नं. ११९३/२०२३ भा.द.वि.सं. कलम ४२०,४०६,४०९,३४ महाराष्ट्र ठेवीदार (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९) चे कलम ३. ४ प्रमाणे, गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने राम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली २ पथके तयार करून, सपोनि गणेश जाधव, सपोनि बळवंत भराडे आणि त्यांच्या पथकाने तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुण्यातील पुणे सावित्रीबाई फुले, विदयापीठ गेट समोर सापळा रचून विनय पुरुषोत्तम वर्टी यास अटक केली.
दरम्यान, याआधी पोलिसांनी सदर गुन्ह्यातील सह आरोपी गिता दिपक तळवडेकर, दिव्य पुस्पराज सिंग, नारायण गोविंद नाईक यांना अटक केली आहे.
तसेच या प्रकरणात आजपर्यंत १५० हुन अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक होऊन एकूण ४,६०,५०,०००/- रुपयांची किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप. आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण, सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, मपोनि/खापरे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बळवंत भराडे, सपोनि गणेश जाधव, पोना शरद रायते, पो.अं मोरे यांनी केली.