मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द…

new delhi – मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ व राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे उपस्थित होते.
मंत्री सामंत यांनी या ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त करत पत्रकारांना सांगितले की, ११ वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तेव्हा ते मराठी भाषेचे राज्यमंत्री होते. याबाबतची अधिसूचना आज स्वीकारताना त्याच विभागाचा मंत्री आहे, हा मोठा योगायोग आहे. महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला हा मान मिळाल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.