चैन स्नॅचिंग, मोबाईल, वाहन चोरीचे एकूण ७० गुन्हे उघडकीस…
thane – ठाणे, भिंवडी, बदलापुर, अंबरनाथ कल्याण, शिळ डायघर परिसरातील महिला व पुरुषांच्या गळयातील जबरीने सोन्याचे मंगळसुत्र, चैन खेचून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना कल्याण गुन्हे शाखेने अटक करून चैन स्नॅचिंग, मोबाईल, वाहन चोरीचे एकूण ७० गुन्हे उघडकीस आणले आहेत. तौफीक तेजीब हुसेन, मोहम्मद अली उर्फ कालीचरण शेवेरी अली, अब्बास सल्लु जाफरी, सुरज उर्फ छोटया मनोज सांळूखे अशी यांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तपास कल्याण गुन्हे शाखा करत असताना सदर गुन्ह्यातील आणि ठाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील चोरटे हे कल्याणमधील आंबिवली परिसरात येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती.
त्याआधारे पोलिसांनी आंबिवली परिसरातील इराणी वस्तीमध्ये सापळा रचून सदर चौघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी चैन स्नॅचिंगचे ४०, मोबाईल चोरीचे २४, वाहन चोरीचे ६ असे एकूण ७० गुन्हे केले असल्याचे सांगितले.
सदर प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून चैन स्नॅचिंग करून चोरी केलेले एकूण ५१ तोळे (५१० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने, २४ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल तसेच ६ मोटार सायकल, १ कार असा एकूण ५०,१८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण ७० गुन्हे उघडकीस आणले आहेत.