Kalyan : काटेमानिवली येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास पालिकेची जाणूनबुजून टाळाटाळ?
Kalyan – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्षेत्र ५ ड हद्दीतील कल्याण पूर्व, काटेमानिवली, जाईबाई शाळा रोड, सागर नगर येथील सागर दशरथ पावशे यांचे तळ अधिक ३ मजल्याचे बांधकाम पालिकेने अनधिकृत घोषित केलेले आहे. तसेच त्यांना १५ दिवसांच्या आत सदर बांधकाम पाडण्याचे आदेश प्रभाग क्षेत्र ५ ड चे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी दिले आहे. परंतु सागर पावशे यांनी हे अनधिकृत बांधकाम पाडले नसल्याने त्यांना आणखी ३ दिवसांची मुदत देऊन हे बांधकाम पाडण्यास सांगितले होते. आणि जर का हे बांधकाम स्वतःहून पाडले नाही तर पालिकेच्या वतीने या अनधिकृत बांधकामावरती निष्कासनाची कारवाई करण्यात येईल असे सदर आदेशात म्हंटले आहे.
परंतु अजूनही हे अनधिकृत बांधकाम स्वतः सागर दशरथ पावशे यांनी पाडलेले नाही आणि महापालिका देखील निष्कासनाची कारवाई करत नसल्याचे दिसून आले आहे.
याबाबत अंकुश जितेंद्र दुबे यांनी पालिकेत तक्रार अर्ज दिला असून, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ५/ड प्रभाग अंतर्गत काटेमानिवली, सागर नगर येथील शासनाचे नियम व कायदे वगळता, परवानगीशिवाय बांधलेल्या अनधिकृत इमारतींचे बांधकामावरील कारवाई प्रलंबित का ठेवलेली आहे. याची पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सखोल चौकशी करून दिरंगाई करणाऱ्या अशा सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात व उपायुक्त (अनधिकृत बांधकाम नियंत्रण) अवधूत तावडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास पालिका का टाळाटाळ करत आहे. असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सदर बांधकामावर सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांचा आशीर्वाद आहे का? तसेच पालिका आयुक्त, उपायुक्त (अनधिकृत बांधकाम नियंत्रण) अवधूत तावडे हे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
पालिका अधिकारी स्वतः आदेश देऊनही कारवाई करण्यास चालढकल करत असतील, वेळकाढूपणा करत असतील, स्वतःच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असतील तर यामुळे अनधिकृत बांधकामांना अभय मिळत आहे.