सांगलीतील चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का…

Sangli – सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात बुधवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
या भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. वारणावती परिसरात सुमारे ८ किलोमीटर क्षेत्रात या भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरण ८५ टक्के इतके भरले आहे. अशा परिस्थितीमध्ये आज पहाटे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भूकंपाचा धक्का जाणवला.
दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. तसेच भूकंप सौम्य असल्यामुळे चांदोली धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे धरण प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.