लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल…

पुणे – वीज मीटर चोरीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुध्द चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या (एसीबी) पुणे विभागाने ही कारवाई केली. दत्तात्रय सर्जेराव शेगर असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार महावितरण विभागात नोकरीस आहेत. तक्रारदाराविरुध्द चंदननगर पोलीस ठाण्यात वीज मीटर चोरीचा गुन्हा दाखल आहे. या पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शेगर यांनी पुढील कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ३ लाख रुपये लाचेची मागणी केली, असा अर्ज तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दिला. दरम्यान, एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली. असता, शेगर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून चंदननगर पोलीस ठाण्यात शेगर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.