महाराष्ट्र

विजय शिवतारे बारामती लोकसभा अपक्ष लढवणार…

पुणे – शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती येथून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. विजय शिवतारे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शिवतारे यांच्या उमेदवारीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती येथून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे पत्रकार परिषद घेत त्यांनी हे सांगितले.

बारामती मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही. देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे. कोणाची मालकी त्यावर नाही. म्हणून पवार-पवार करण्याऐवजी आपण आपला स्वाभिमान जागृत करून लढायचं’ असा निर्धार व्यक्त करत शिवतारे यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला.

शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, 2019 च्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्या मुलाविरोधात प्रचार केला पण तो राजकारणाचा भाग होता, निवडणुकीत कर्तव्य म्हणून केलं होतं. त्यात काहीच वैयक्तिक नव्हतं. पण अजित पवार यांनी नीच पातळी गाठली. मी २३ दिवस रुग्णालयात होतो, ट्रीटमेंट सुरू असतानाही मी अँब्युलन्समधून प्रचार केला. तेव्हा (माझी) पालखी जाणार, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

मरायला लागलात तर कशाला निवडणूक लढवताय ? तुम्ही खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे खोट बोलत आहात, असा गलिच्छ आरोप त्यांनी केला. माझ्या गाडीचा नंबर, कोणत्या कंपनीची गाडी इथंपर्यंत अजित पवार खालच्या थरापर्यंत आले. तु कसा पुढे निवडून येतोस तेच मी बघतो… महाराष्ट्रात मी कोणाला पाडायचं ठरवलं तर मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतोच असेही अजित पवार म्हणाल्याचा आरोप शिवतारेंनी केला.

मी त्यांना त्यांच्या उर्मट भाषेसाठी मी त्यांना माफ केलं. ते महायुतीत आल्यानंतर भेटून मी त्यांचा सत्कारही केला. पण पुढचे सहा ते सात महिने त्यांची गुर्मी तशीच राहिली, असं विजय शिवतारे म्हणाले. महायुतीत आल्यावरही त्यांची गुर्मी तशीच होती. त्यांचा उर्मटपणा कायम होता. लोक म्हणायला लागले, सुनेत्रा आणि सुप्रिया आहेत. पण अजित पवार उर्मट आहेत, म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू, असं लोकं म्हणायला लागलेत, असंही शिवतारे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page