डोंबिवलीत शवविच्छेदन कक्ष सुरु होणार…

डोंबिवली – कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत सामान्य रुग्णालय, शास्त्रीनगर, डोंबिवली येथे नवीन शवविच्छेदन केंद्र सुरु करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून, यासंदर्भात शासन निर्णय काढला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाठपुरावा केला असून, अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे लवकरच या रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष सुरु होणार आहे.
याबाबत रवींद्र चव्हाण म्हणाले कि, आपल्या डोंबिवलीची लोकसंख्या गेल्या अनेक वर्षात सातत्याने वाढत आहे. तशी जीवनातली धकाधकीही वाढत आहेत. या धावपळीच्या जीवनात अकस्मात मृत्यू सारखे काही दुर्दैवी प्रसंग आले तर मृतदेहाला डोंबिवलीहून रात्री अपरात्री किंवा आडवेळेला कल्याणला पोस्टमार्टेमसाठी नेणे हे आव्हानात्मक ठरत होते.
कल्याण शव विच्छेदन केंद्राबाबत डोंबिवलीकरांना होत असलेल्या गैरसोयीची तक्रार डोंबिवलीतील माझ्या सार्वजनिक जीवनात अनुभवली, त्यातूनच या विषयी डोंबिवलीत शास्त्रीनगर हॉस्पिटलला सुरु करण्याचे ठरवले होते. कारण मृत व्यक्तीच्या नातेवाईक आणि मित्र मंडळींना हा त्रास भोगायला लागायचा म्हणून डोंबिवलीतच शव विच्छेदन सुरु व्हावे यासाठी प्रयत्न करत होतो.

वास्तविकपणे, शव विच्छेदन कक्ष उभारणीत अनेक किचकट तांत्रिक अडचणी होत्या. पण हे सार्वजनिक हिताचे आणि अत्यावश्यक स्वरूपाचे काम असल्याने मी देखील मागे हटलो नाही. आज याबाबत शासन निर्णय झाला आहे. पाठपुरावा केल्याचं आणि शासन निर्णय झाला त्याचं समाधान आहे, असे ते म्हणाले. तसेच आप्तेष्टांवर एक दुःखाचा प्रसंग ओढवल्यावर त्यांच्या यातना कमी करण्यासाठी ही आवश्यक अशी नागरी सुविधा डोंबिवलीतच सुरु होईल.
आपलं सरकार गतिमान आणि लोकहिताचेच निर्णय करत असल्याचे आपल्याला आज आणि भविष्यात दिसेल, असेही चव्हाण म्हणाले.
दरम्यान, गृह विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत सामान्य रुग्णालय, शास्त्रीनगर, डोंबिवली येथे प्रस्तावित नवीन शवविच्छेदन केंद्र सुरु करण्याकरिता आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे निरीक्षणे नोंदवून संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांचे ना हरकत देण्याकरिता संचालनालयामार्फत गठित त्रिसदस्यीय समितीने शिफारस केली होती .
सदर शिफारशीच्या अनुषंगाने आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत सामान्य रुग्णालय, शास्त्रीनगर, डोंबिवली येथे शवविच्छेदन केंद्र सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.