केडीएमसीचे सहा आयुक्त भारत पवार यांची बदली करण्याची सामाजिक कार्यकर्त्याची मागणी; मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा…
डोंबिवली – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ई प्रभागाचे सहा. आयुक्त भारत पवार यांची बदली करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हजारे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली असून, याबाबतचे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले आहे. तसेच सहा. आयुक्त भारत पवार यांची बदली न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशाराही हजारे यांनी पत्रातून दिला आहे.
भारत पवार हे अनेक वर्षापासून ई प्रभागात सहा आयुक्त पदी कार्यरत असून, त्यांच्या आर्शिवादाने ई प्रभागात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम चालू असल्याचे हजारे यांचे म्हणणे आहे. तसेच भारत पवार एका माजी आमदारांचे भाऊ असल्याकारणाने त्यांच्या मर्जीनुसार ई प्रभागात अनेक अनधिकृत बांधकामे चालत असल्याचा आरोप हजारे यांनी पात्रातून केला आहे.
शिवाय एकाच प्रभागात नियमाप्रमाणे अनेक वर्ष एखादा अधिकारी कसे काय काम करू शकतो? असा सवालही हजारे यांनी केला असून, ज्याप्रमाणे आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी कामचुकार आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली त्याचप्रमाणे ई प्रभागाचे सहा. आयुक्त भारत पवार यांची बदली देखील करण्यात यावी अशी मागणी हजारे यांनी केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.