पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून; पत्नीसह प्रियकराला मानपाडा पोलिसांनी केली अटक…
कल्याण- प्रियकराच्या मदतीने एका पत्नीने आपल्या पतीचा खून केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पत्नी रिता चंद्रप्रकाश लोवंशी आणि तिचा प्रियकर सुमित राजेश विश्वकर्मा या दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आडीवली गाव, नेताजीनगर, गणेश-राधाकृष्ण मंदिराचे मागील बाजुस असलेल्या विहीरीमध्ये एका इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, त्याठिकाणी सदर मृतदेहावर गळ्यावर वार केलेले आणि त्याला दगडाला बांधून विहिरीत ढकलला असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता, रिता चंद्रप्रकाश लोवंशी या महिलेने आपल्या पतीची मिसिंगची तक्रार दाखल केली असून, मयत इसम आणि मानव मिसींग प्रकरणातील इसम एकच असुन त्याचे नाव चंद्रप्रकाश सुरेशचंद्र लोवंशी असल्याचे समोर आले.
पोलिसांना याबाबत चंद्रप्रकाश लोवंशी यांची पत्नी रिता हिच्यावर संशय आल्याने तिच्याकडे चौकशी केली असता, तिने तिचा प्रियकर सुमित विश्वकर्माचे नाव सांगितले. आणि सदर घटना समोर आली.
सुमित विश्वकर्मा व रीताचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यामध्ये तिचा पती चंद्रप्रकाशची अडचण होत असल्याने त्याच्या हत्येचा कट या दोघांनी रचला आणि त्याप्रमाणे सुमित विश्वकर्मा व त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांनी एका कारमध्ये चंद्रप्रकाश याला एका निर्जन स्थळी नेले. त्या ठिकाणी चंद्रप्रकाशचा गळा चिरून पाठीवर गुडघ्यावर वार करून क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह अडवली परिसरातील एका विहिरीत दगड बांधून फेकून दिला. याच दरम्यान रिता लोवंशी हिने पती चंद्रप्रकाश हा बेपत्ता असल्याचे तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
सदरची यशस्वी कामगिरी सह पोलीस आयुक्त, दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण सचिन गुजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोबिवली विभाग सुनिल कुराडे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वपोनि अशोक होनमाने, पोनि राम चोपडे, पोनि दत्तात्रय गुड, मसपोनि निशा चव्हाण, सपोनि संपत फडोळ, सपोनि प्रशांत आंधळे, सपोनि राळेभात, पोउनि संजय जगताप, पोहवा ठिकेकर, पोहवा पवार, पोहवा मासाळ, पोहवा माळी, पोहवा भोईर, पोहवा गडगे, पोहवा खिलारे, पोना भोसले, पोना कातकडे, पोना किनरे, पोना यल्लापा पाटील, पोशि जगेवाड, पोशि चव्हाण, पोशि आव्हाड, पोशि आहेर यांनी केली.