डोंबिवलीत वाघाचे कातडे, पिस्टल विक्री करण्यासाठी आलेले दोघे अटकेत…
कल्याण गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी…
कल्याण – पट्टेरी वाघाचे कातडे, देशी बनावटीचे पिस्टल आणि २ जिवंत राउंड विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. सिताराम रावण नेरपगार आणि ब्रिजलाल साईसिंग पावरा अशी या दोघांची नावे असून, पोलिसांनी यांच्याकडून एकूण ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
डोंबिवलीत २ तस्कर पट्टेरी वाघाचे कातडे, देशी बनावटीचे पिस्टल आणि २ जिवंत राउंड विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पो. हवा. दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी डोंबिवली पूर्वेतील मानपाडा मधील कल्याण-शिळफाटा रोडवरील क्लासिक हॉटेलच्या पार्किंगमध्ये सापळा रचून सदर दोघांना अटक करून त्यांच्याकडून पट्टेरी वाघाचे कातडे, १ देशी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत राउंड, २ मोबाईल आणि आधारकार्ड असा एकूण ४५,५२,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पंजाबराव उगले पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील सहा. पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक ३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहा.पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण, पो.हवा. दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विजेंद्र नवसारे, अनुप कामत, विलास कडु, विनोद चन्ने, तसेच वनपाल वन विभाग, कल्याण येथील वनपाल राजु शिंदे, वनरक्षक महादेव सांवत यांनी केली.