डोंबिवलीतील ७ स्टार बार मध्ये गोळीबार; एकजण जखमी…

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील ७ स्टार बार मध्ये किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेत हा तरुण जखमी झाला. विकास उर्फ राजा अंकुश भंडारी असे याचे नाव आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणी ५ जणांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील कल्याण शीळ रोडवरील ७ स्टार बार मध्ये रात्रीच्या सुमारास हि घटना घडली. विकास भंडारी आणि त्याचा मित्र या बार मध्ये दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी टेबलला धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून अजय सिंग आणि त्याच्या ४ साथीदारांनी विकास भंडारी आणि त्याच्या मित्रास शिवीगाळ करत मारहाण केली तसेच अजय सिंग याने विकास भंडारीवर बंदुकीने गोळी झाडली. आणि या सर्वानी तेथून पळ काढला. दरम्यान, यात विकास जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ आणि सहा. पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनिरी अशोक होनमाने आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमी विकास भंडारीला रुग्णालयात दाखल केले तसेच अजय सिंग आणि त्याच्या ४ साथीदारांविरुद्ध गुन्हा करून त्यांना अटक केली.