तरुण तरुणींचे स्वप्न भंग होत आहेत आणि उपमुख्यमंत्री…; जयंत पाटीलांनी व्यक्त केला संताप…

मुंबई – तलाठी भरती प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. वडेट्टीवारांनी पुरावे द्यावेत, परीक्षा रद्द करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले होते. फडणवीस यांच्या विधानावर जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.
स्पर्धा परीक्षेदरम्यान सातत्याने होत असलेली पेपर फुटी, भ्रष्टाचार यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवण्याची आशा बाळगणाऱ्या तमाम तरुण तरुणींचे स्वप्न भंग होत आहेत आणि उपमुख्यमंत्री पुरावे मागत आहे असे जयंत पाटील म्हणाले.
याबाबत त्यांनी ट्वीट करत म्हटले की, स्पर्धा परीक्षेदरम्यान सातत्याने होत असलेली पेपर फुटी, भ्रष्टाचार यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवण्याची आशा बाळगणाऱ्या तमाम तरुण तरुणींचे स्वप्न भंग होत आहेत आणि उपमुख्यमंत्री पुरावे मागत आहे.
नुकताच तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला. २०० गुणांच्या परीक्षेत त्यापेक्षा जास्त गुण मिळाल्याची किमया झाली आहे. कसे झाले? यावर उपमुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकायला हवा.
शासकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पेपरफुटीला कारणीभूत असलेले दलाल आपली पोळी भाजून घेत आहेत. “जर तर”ची भाषा करत सत्तेतील जबाबदार व्यक्ती नाममात्र राहण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील तरुण पिढीची अवस्था दयनीय करत, भावी प्रशासकीय यंत्रणेची घडी विस्कटून टाकण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत क आणि ड गटातील पदभरतीसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना करावी, अशी मागणी मी यापूर्वीच केली होती. सरकार या विषयासाठी गंभीर नाही हेच दिसते आहे. या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी विनंती जयंत पाटील यांनी केली.