मराठी पाट्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश…

नवी दिल्ली – दुकानांवर मराठी पाट्या लावण्याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. २ महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा असा आदेश सुप्रीम कोर्टाने व्यापाऱ्यांना दिला आहे. मराठी पाट्या लावण्याच्या सक्तीविरोधात व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या.बी.वी.नागरत्ना आणि न्या.उज्ज्वल भूयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
तुम्ही मराठी भाषेत पाट्या का लावू शकत नाही? कर्नाटकातसुद्धा असाच नियम आहे, असे नाही केले तर दुकानदार मराठी फॉन्ट छोटा ठेवतात. आता दसरा, दिवाळी येतेय, त्यामुळे व्यापार वाढवण्याची चांगली संधी आहे. तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठी भाषेत पाट्या असण्याचे फायदे माहिती नाहीत का?
तुम्ही महाराष्ट्रात आहात, २ महिन्यात मराठी पाट्या लावा, कोर्ट कचेरीत पैसे खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा, तसेच जर आम्ही तुम्हाला परत मुंबईत हायकोर्टात पाठवले तर मोठा आर्थिक दंडही तुम्हाला सहन करावा लागेल असे यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हण्टले आहे.