शरद पवारांबद्दल अजित पवारांनी व्यक्त केली कृतज्ञता…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार भावुक झाले. कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
राष्ट्रवादीची स्थापना होत असताना सगळ्यांनी खूप कष्ट घेतले. भुजबळसाहेब पायाला भिंगरी बांधून फिरत होते, त्यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. आज २५ वर्ष पूर्ण होत असताना काही लोक आपल्याबरोबर नाहीत, याची मला खंत आहे. आर.आर आबा, बेंडके सर अशा अनेकांचं महत्त्वाचं योगदान होतं. गेली २४ वर्ष पवार साहेबांनी पक्षाचं नेतृत्व केलं, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असे म्हणताना अजित पवार भावुक झाले.
जुलै अखेरिस आपले राज्यसभेत तीन खासदार असतील. लोकसभेत सुनिल तटकरे आहेत. आपल्याला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी चालेल, पण आपण जोमाने लढू. मी अर्थसंकल्प सादर करेपर्यंत चार दिवस अर्थसंकल्पासाठी आणि चार दिवस पक्षासाठी देईन, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
जोपर्यंत सूर्य-चंद्र आहे तोपर्यंत संविधान कुणी माईचा लाल बदलू शकणार नाही, तरी विरोधकांचा नरेटिव्ह सेट झाला. त्यांना मिळालेली मतं आणि आपल्याला मिळालेली मतं यांच्यात फक्त 1/2 टक्क्याचा फरक आहे. आज नितीशजी आणि चंद्रबाबूंनी काही महत्त्वाच्या गोष्टी मागितल्या, येत्या काळात आपणही अशा काही गोष्टी मिळवू, असं अजित पवार म्हणाले.