महापुरुषांविरुद्ध अवमानजनक वक्तव्य केल्यास कारवाई करणार – फडणवीस…
मुंबई – महापुरुषांविरुद्ध अवमानजनक वक्तव्य केले तर त्याचे समर्थन शासन करणार नाही. संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर अमरावती येथे गुन्हा दाखल झालेला आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करणाऱ्या ‘शिदोरी’ या मासिकावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
विधानपरिषद आणि विधानसभेत या दोन्ही सभागृहात त्यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध अमरावती येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अमरावती पोलीसांनी नोटीस बजावली असून ती त्यांनी स्वीकारली आहे. त्यांनी दोन पुस्तकांतून काही मजकूर त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने वाचून दाखविला. ही दोन्ही पुस्तके काँग्रेस नेत्यांनी लिहिली असल्याचा त्यांनी दावा केला आहे. कोणत्याही महापुरुषांचा अपमान हे सरकार सहन करणार नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘शिदोरी’ या मासिकावरसुद्धा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल. संभाजी भिडे गुरुजी हे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि किल्ल्यांची माहिती बहुजन समाजाला देऊन ते समाजाला जोडतात, हे कार्य चांगलं आहे. पण त्यांना महापुरुषांवर अवमानजनक वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे महापुरुषांवर कोणीही अशाप्रकारे वक्तव्य केलं, तर त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले