धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार…
मुंबई – जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई ही सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ट्रेन पालघर आणि विरार या स्थानकादरम्यान असताना हा प्रकार घडला.
एक्सप्रेस ट्रेनच्या बोगी क्रमांक बी-५ मध्ये गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन कुमार याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर चेतन सिंह याने साखळी खेचून ट्रेन थांबवली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाईंदर रेल्वे पोलिसांनी चेतन सिंह याला रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेतले.