मुंबई

शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय मागे…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार कायम राहणार आहेत. याबाबतची घोषणा त्यांनी स्वतः केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हि घोषणा केली.

शरद पवार म्हणाले की, मी 2 मे रोजी माझ्या ‘लोक माझे सांगाती’ ह्या आत्मचरित्रपराच्या अनावरण समारंभावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भुमिका होती. पण, मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने ‘मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.

मी पुन्हा अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील, असेही पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page