१० लाखांची मागणी करणारा पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात…

मुंबई – गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी करणाऱ्या दहिसर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. राजेश गुहाडे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, त्याच्यासह लाचेच्या रक्कमेपैकी १ लाख स्वीकारणारा खासगी व्यक्ती गौरव मिश्रा याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांचे बँक खाते गोठवण्यात आले. यासंदर्भात तक्रारदार यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता बँक कर्मचाऱ्यांनी तक्रारदार यांना दहिसर पोलीस ठाणे येथील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश गुहाडे यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी गुहाडे यांना संपर्क करून भेट घेतली, त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाली असून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी केली. तडजोडीअंती ५ लाख रुपयाची मागणी करताच तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात या संदर्भात तक्रार केली.तक्रार अर्जाच्या पडताळणी नंतर पोलीस उपनिरीक्षक गुहाडे यांनी तडजोडी अंती ३ लाखाची मागणी करून खासगी व्यक्ती गौरव गम शिरोमणी मिश्रा याच्यामार्फत लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार करण्यात आलेल्या सापळा कारवाईत मिश्रा हा मागणी केलेल्या रक्कमेपैकी १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ मिळून आला. त्यानुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.