मुंबई

मंत्रिमंडळ निर्णय…

गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा

मुंबई – गुढीपाडवा तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार
५१७७ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता
१८२ गावांना सिंचनाचा लाभ

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.

प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा सुरु होऊन तो ८५ कि.मी. लांब आहे. नदीच्या उजव्या तीराने जाणारा कालवा ९७ कि.मी. आहे. या दोन्ही कालव्यातून ६८ हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. २०२७ पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रर्वण भागातील १८२ गावांना सिंचनाचा लाभ होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page