रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न…

बुलढाणा – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरुन रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकर हे पोलिसांच्या वेशात आले आणि बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले.
कापूस व सोयाबीनच्या दरवाढीसह पीकविमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास ११ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुंबईत शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. रविकांत तुपकर यांना यासंदर्भात पोलिसांनी नोटीसही बजावली होती. परंतू ११ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविकांत तुपकर यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी वेळीच तुपकर यांना रोखले.