अती धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करा…

ठाणे महापालिका आयुक्तांचे निर्देश…
ठाणे – ठाणे शहरात अती धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारती नागरिकांच्या जिविताच्या सुरक्षेसाठी तातडीने रिकाम्या कराव्यात. त्या इमारती रिकाम्या करताना महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, अरेरावी करू नये, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
पावसाळा पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीत, रिक्त करायच्या अती धोकादायक इमारती, त्यातील अडचणी, पर्यायी व्यवस्था, संक्रमण शिबिरे आदींबाबत चर्चा झाली.
पाणी आणि वीज पुरवठा खंडित करावा
अती धोकादायक (सी 1 वर्ग) आणि धोकादायक (सी 2 a वर्ग) या दोन्ही प्रकारातील इमारतींचा पाणी आणि वीज पुरवठा तत्काळ खंडित करावा. जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कार्यवाहीबद्दल नगरविकास विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यात अजिबात दिरंगाई होऊ नये, असे निर्देशही आयुक्त बांगर यांनी दिले.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८६ अती धोकादायक इमारती आहेत. त्यातील ३७ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर, ४९ इमारतींमध्ये नागरिकांचा निवास आहे. या ४९ अती धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात असे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले. या इमारतींमधील नागरिकांनी तत्काळ पर्यायी जागेत स्थलांतरित व्हावे. अती धोकादायक अधिकृत इमारतींमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था होत नसल्यास, तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यकता भासल्यास, तात्पुरती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
अनधिकृत अती धोकादायक इमारतींमधील कुटुंबांची शाळांमध्ये तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली जाईल. त्यांनी तेवढ्या कालावधीत नवीन जागेचा शोध घ्यावा, असेही आयुक्तांनी नमूद केले.
शंका असेल तिथे व्हीजेटीआय किंवा आयआयटी यांची मदत घ्यावी
ज्या धोकादायक इमारतींच्या दुरुस्ती अहवालाबाबत शंका आहे, त्यांचे अहवाल व्हीजेटीआय किंवा आयआयटी यांच्याकडून जलद तत्वावर महापालिकेने तपासून घ्यावेत. आवश्यकता पडल्यास त्याचा खर्च महापालिकेने करावा, असे आयुक्तांनी सांगितले.
तातडीची दुरुस्ती करून घ्यावी
ठाणे महापालिका क्षेत्रात धोकादायक परंतु रचनात्मक दुरुस्ती केल्यावर निवास योग्य होतील अशा १९२ इमारती आहेत. त्या इमारती रिक्त करून त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. या इमारतींमधील कुटुंबांना या दुरुस्ती काळापुरती नजिकच्या शाळांमधील संक्रमण शिबिरात तात्पुरती पर्यायी निवास व्यवस्था देण्यात येईल. या इमारतीची दुरुस्ती संबंधितांनी ताबडतोब करून घ्यावी, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.
अती धोकादायक आणि धोकादायक इमारतींशिवाय जुन्या इमारतींमध्ये इमारत रिकामी न करता दुरुस्ती करणे (२३७४) आणि इमारतीची किरकोळ दुरुस्ती करणे (१६४७) अशा स्वरूपाच्या इमारती शहरात आहेत. त्यांनीही तत्काळ दुरुस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
अधिकृत इमारतीतील काही कुटुंबांची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्यास, स्थानिकांना शक्यतो मान्य होईल असा पर्याय देण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे त्या कुटुंबांची कमीत कमी गैरसोय होईल. तसेच, अती धोकादायक आणि धोकादायक इमारती रिकाम्या करताना धोक्याची स्थिती समजावून सांगा, लोकप्रतिनिधींना त्या इमारतीची परिस्थिती सांगा. नागरिक त्यास नक्की सहकार्य करतील. कोणालाही राहते घर सोडावे लागणे दुःखद असते. त्यामुळे त्यांच्या भावना समजून त्यांच्या स्थलांतरासाठी मदत करावी. कोणत्याही परिस्थितीत दुर्घटनेमुळे होणारी जीवितहानी टाळणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.
दरम्यान, पर्यायी निवासासाठी उपलब्ध जागा, नजीकच्या शाळांमधील संक्रमण शिबिरे यांची विभागवार यादी करून परिमंडळ उपायुक्तांना तातडीने द्यावी, असे आयुक्तांनी स्थावर विभागाला सांगितले.
इमारतींवर फलक लावावेत
अती धोकादायक आणि धोकादायक इमारतींवर दर्शनी भागात, ही इमारत अती धोकादायक असल्याचे फलक लावावेत. इतर धोकादायक इमारतींवर, इमारत पडण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात याची माहिती ठळकपणे लावावी. म्हणजे नागरिक जागरूक राहतील, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.
या बैठकीस, उपायुक्त मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे उपस्थित होते.