कोकण मराठी साहित्य परिषदेचा पत्रकार दिन सन्मान सोहळा संपन्न…

डोंबिवली – मराठी वृत्तपत्र सृष्टीचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करत कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे जिल्हा यांच्या तर्फे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती आणि पत्रकार दिनानिमित्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मराठी वृत्तपत्र सृष्टीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा दर्पण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
दै. प्रहारचे संपादक, सुकृत खांडेकर आणि कोमसाप ठाणे जिल्हा, अध्यक्ष बाळ कांदळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व) येथे पार पडला.
युवा सूत्रचे संपादक युवराज सुर्ले, महाराष्ट्र न्यूज संपादिका अमृता पाटणकर-चौहान आणि विविध वृत्तपत्र, चॅनेलचे संपादक, पत्रकार यांना हा पुरस्कार देण्यात आला.

बाळशास्त्री जांभेकर यांनी त्या काळात दर्पण हा अंक कसा सुरु केला असेल आणि का सुरु केला असेल हे सगळं अद्भुत आहे. कल्पनेच्या पलीकडे आहे. त्यांच्यामुळे आपण आज लेखक, वाचक, साहित्यिक आहोत त्यामुळे त्यांचे ऋण कधीही विसरता येणार नाही. असे आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे दै.प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर म्हणाले. तसेच त्यांनी त्याकाळात सुरु झालेला पत्रकारितेचा प्रवास आजच्या डिजिटल क्रांती पर्यंत येऊन कसा पोहचला यावर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी मराठी पत्रकार व संगीत नाटककार विद्याधर गोखले यांच्या जनशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस मनोगतातून अभिवादन केले.

कोमसापचे ठाणे जिल्हा, अध्यक्ष बाळ कांदळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वाचन हे किती महत्त्वाचे असून, किमान एक मराठी वृत्तपत्र, पुस्तक आपण वाचले पाहिजे असे सांगून त्यांनी वाचनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात कवी ऍड. डॉ. सोपान बुडबाडकर यांचे तारुण्याची आठवण या पुस्तकाचे प्रकाशन तसेच दिवाळी अंक पुरस्कार आणि उत्कृष्ट पुस्तक पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला कोमसापचे पदाधिकारी, पत्रकार, साहित्यिक, कवी, वाचक आणि इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कोमसाप कल्याण शाखेचे अध्यक्ष डॉ.योगेश जोशी यांनी केले.