चोरी करणाऱ्यास बाजारपेठ पोलिसांनी केली अटक…

कल्याण – एकाच घरात दोनवेळा चोरी करणाऱ्यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. रियाज शेख असे याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण २ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बायकोचे बाळंतपण आणि बहिणीच्या आजारपणामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्यामुळे त्याने चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे. रियाजने आधी ज्या घरात चोरी केली त्याच घरात पुन्हा चोरी केली. याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत वृत्त असे आहे कि, कल्याण पश्चिमेत मेमन मस्जिद परिसरात गुलजार टांगेवाली चाळ परिसरात व्यापारी फारुख शेख राहतात. त्यांच्या घरासमोरच रियाज हा राहण्यास असून तो रिक्षा चालवण्याचे काम करतो. रियाज याची पत्नी गरोदर व बहीण आजारी असताना त्यांच्या उपचारावर लाखो रुपयांचा खर्च झाला होता. त्यामुळे त्याला आर्थिक समस्या निर्माण झाली. त्यामुळे त्याने फारुख यांचे कुटुंब घरात नसताना त्यांच्या घरातील ८ तोळे सोने व ७ हजारांची रोकड चोरली. त्यानंतर फारुख हे त्यांच्या एका नातेवाईकांचे निधन झाल्याने बाहेर गेले होते. त्यावेळी रियाजने फारुख यांच्या घरातील १७ हजारांची रोकड चोरली. सदर बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास केला असता गुप्त बातमीदाराने १ व्यक्ती फारुख यांच्या घरी गेल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रियाजला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्याने बारदान गल्ली परिसरात चोरी केल्याचेही सांगितले. तेथून त्याने १ तोळे सोने व ४० हजाराची रोख रक्कम चोरली होती. सदर प्रकरणी पोलिसांनी ३ गुन्ह्याची उकल करून त्याच्याकडून ५ हजाराची रोख रक्कम व ९ तोळे सोने असा एकूण २ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.