लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात…

लातूर – सिंचन विहीरीचा प्रस्ताव पंचायत समिती चाकुर येथे दाखल केल्याचा मोबदला तसेच यापुढे सिंचन विहीर मंजूर होण्यासाठीच्या कामात मदत करण्यासाठी म्हणून ३ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या बोथी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांनी रंगेहात पकडले.
परशुराम पंढरी गायकवाड असे या ग्रामसेवकाचे नाव असून, एसीबीने दुसऱ्यांदा लाच प्रकरणी सदर ग्रामसेवकाला पकडले असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांचा एमजीनरेगा अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीरीचा प्रस्ताव पंचायत समिती चाकुर येथे दाखल केल्याचा मोबदला तसेच यापुढे सिंचन विहीर मंजूर होण्यासाठीच्या कामात मदत करण्यासाठी म्हणून ग्रामसेवक परशुराम गायकवाड यांनी ३,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती.
त्याप्रमाणे ग्रामसेवक गायकवाड यांनी चाकुर बस स्टँड येथील कॅन्टीन मध्ये लाच मागणी केलेली रक्कम ३,०००/- रुपये स्विकारली असता त्यांना एसीबीने रंगेहात पकडले.