कल्याण डोंबिवली रेरा प्रकरण; ५ जणांना अटक…

डोंबिवली – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व महारेरा कार्यालयाच्या बनावट परवानगी विक्री करणाऱ्या पाच जणांना विशेष तपास पथकाने अटक केली. 1) प्रियंका सिताराम रावराणे (मयेकर) 2) प्रविण सिताराम ताम्हणकर 3) राहुल बाबुराव नवसागरे 4) जयदिप भागीनाथ त्रिभुवण 5) कैलास ज्ञानदेव गावडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व महारेरा कार्यालयाच्या बनावट परवानगी विक्री करून गोरगरीबांची व शासनाची फसवणुक केली जात आहे. या संदर्भात कारवाई होणेसाठी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे जनहित याचा क्रमांक 49/2021 अन्वये दाखल केलेली याचिका न्यायप्रविष्ठ आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बनावट बांधकाम परवानगीची कागदपत्रे तयार करून बेकायदा बांधकाम संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मानपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं 750/ 2022 व डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.नं 370/2022 भा.द.वि कलम 420, 465, 467, 468, 471, 409, 34,114, 120 ब असे 02 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयामध्ये एकूण 65 सव्र्व्हे वरील जमिनीवर बनावट बांधकाम परवानगीच्या आधारे महारेरा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून मोठया प्रमाणात अनाधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहेत. त्याद्वारे महानगरपालिकेचा विकास अधिभार बुडविला गेल्याने शासनाची आणि सर्व सामान्य जनतेची फसवणुक केली असल्याने अशा अनाधिकृत बांधकाम करणारे भुमाफिया सक्रिय असल्याने निष्पन्न झाले.

तसेच सदर गुन्हयाच्या तपासामध्ये बनावट बांधकाम प्रमाणपत्राचा वापर करून अनाधिकृत विकास कामे करणारे जमिन मालक, विकासक, कंत्राटदार यांची माहिती मिळवून प्रत्यक्षात बनावट बांधकाम प्रमाणपत्र तयार करून त्या आधारे महारेरा प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सदर गुन्हयामध्ये भूमिका असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर ५ जणांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात एसआयटीने ६५ पैकी ४० बिल्डरांची बँक खाती नुकतीच गोठविली आहे. रेराने देखील ६५ पैकी ५२ जणांच्या परवानग्या रद्द केल्या आहेत.
पोलीस आयुक्त जय जीत सिंग, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पथकाने गुन्हयातील आरोपींना अटक केली.