मुंबई

तंत्रनिकेतनाच्या उन्हाळी २०२२ फेरपरिक्षेचा निकाल जाहीर…

मुंबई –  मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरु होते. त्यानंतर प्रथमच उन्हाळी 2022 ही परिक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन घेण्यात आली. या परिक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी हितासाठी फेरपरिक्षा घेण्यात आली, या  तंत्रनिकेतनच्या उन्हाळी 2022 फेरपरिक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेमध्ये 13 हजार 787 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली होती. तसेच टेक्निकल अभ्यासक्रम प्रात्यक्षिकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विषयाचे आकलन होण्यासही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी द्यावी अशी पालक, संस्था, संघटनांची मागणी होती. त्यानुसार शासनाने फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थातील अंतीम सत्र/ वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास्तव उन्हाळी 2022 च्या परिक्षेत अंतीम सत्र वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता एक विशेष बाब म्हणून ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जवळपास 47 हजार 223 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 13 हजार 787 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 198 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.

या परिक्षेचा निकाल वेळेत जाहीर केला असल्याने अभियांत्रिकी पदवी परिक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.21 ऑक्टोबरपर्यंत असल्याने हे विद्यार्थी थेट द्वितीय वर्षाकरिता सुद्धा अर्ज करु शकतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page