कारमधील चालकासह प्रत्येक प्रवाशाला सीटबेल्ट लावणे बंधनकारक…

मुंबई – आता वाहन चालकासह गाडीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सीटबेल्ट लावणं अनिवार्य असणार आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची कडक अमंलबजावणी केली जाणार आहे.
मुंबई पोलिसांची अधिसूचना…
मोटार वाहन (सुधारित) कायदा 2019 कलम 194(ब) (1) मध्ये चारचाकी मोटार वाहनातील वाहन चालक आणि इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यास ते दंडास पात्र असलेबाबत सूचित करण्यात येत आहे. या अनुषंगाने ज्या चारचाकी वाहनांमध्ये सर्व सहप्रवाशांना सीटबेल्ट करता सुविधा नसेल त्यांना 1 नोव्हेंबर रोजीपर्यंत सीटबेल्टबाबत आवश्यकती सुधारणा करण्याकरता अवधी देण्यात येत आहे. त्यानंतर मुंबई शहरातील रस्त्यावरुन चारचाकी मोटार वाहनाने प्रवास करणाऱ्या चालक आणि इतर प्रवासी यांनी सिटबेल्ट लावणे बंधनकारक राहील अन्यथा त्यानंतर मोटार वाहन (सुधारित) कायदा 2019 कलम 194 (ब) (1) अन्वये कारवाई करण्यात येईल.