बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा; रेडी रेकनर दरांमध्ये…

mumbai – राज्य सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ एप्रिल पासून लागू होणारे दर मागील वर्षाप्रमाणेच कायम राहणार असून, घर खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची घोषणा केली आहे.
सध्याची जागतिक परिस्थिती आणि बांधकाम क्षेत्रातील मंदी लक्षात घेऊन राज्य सरकारने रेडी रेकनर (ASR) दरांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात राज्यातील रेडी रेकनर दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
सन २०२५-२६ मधील दरच सन २०२६-२७ साठी कायम ठेवण्यात आले असून, यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह घरखरेदीदारांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) तसेच दस्त लेखनिक यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही बावनकुळे म्हणाले.



