मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण, खंडणीचे आरोप…

mumbai – मारहाण करून खंडणी वसूल केल्याचे गंभीर आरोप मुंबई महापालिकेच्या एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. याबद्दल पाटील यांच्यासह अन्य चार जणांविरोधात मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार देण्यात आली आहे.
निश्चित पटेल नावाच्या व्यक्तीने हे आरोप केले आहेत.
पटेल यांच्या म्हणण्यानुसार,व्यवसाय विस्तारासाठी महेश पाटील यांच्याकडून पटेल यांनी सुरुवातीला सात कोटी रुपयांची मदत घेतली होती. रोख स्वरूपात एकाचवेळी मदत मिळाली. मात्र, पैसे परत करायचे होते, तेव्हा पाटील यांनी मूळ रकमेपेक्षा जास्त म्हणजेच १४ ते १५ कोटी रुपयांची जबरदस्तीने वसूली केली. ही रक्कम देण्यासाठी आपल्याला आपले दागिने, गाडी आणि इतर मालमत्ता विकावी लागली. तसेच पाटील यांनी स्वतःच्या कार्यालयात मला डांबून मारहाण केली. याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भातील मारहाणीचे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत.
सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण कोणतीही मारहाण केली नाही किंवा कोणतीही जबरदस्ती अथवा धमकी दिली नाही. काही दिवसांपासून समाज माध्यमांवर आणि प्रिंट मीडियात जो व्हिडिओ प्रसारित होत आहे, ज्यात निशित पटेल यांना मारहाण करताना दिसत आहे, त्या घटनेच्या वेळी आपण किंवा आपल्या कर्मचाऱ्यांपैकी कोणीही उपस्थित नव्हते असे महेश पाटील यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करत आहेत.



