एकनाथ खडसेंच्या घरी चोरी; सोने, रोख रक्कम लंपास

jalgaon – माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील ‘मुक्ताई बंगला’ या निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केली आहे.
माहितीनुसार, चोरट्यांनी सहा ते सात तोळे सोने आणि सुमारे ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. सकाळी साफसफाईसाठी आलेल्या कामगारांच्या नजरेस दरवाज्याचे कुलूप तोडलेले आणि कपाटे अस्ताव्यस्त दिसल्याने हा प्रकार उघड झाला. कामगाराने तत्काळ खडसे यांना कळवले आणि खडसे यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली.

दरम्यान, घटनेबद्दल माहिती देताना खडसे म्हणाले कि, घरातून ३५ हजाराची रोकड आणि सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. तसेच खाली आमचे नातेवाईक राहत होते, त्यांचेही पाच तोळे सोने चोरीला गेलेले आहे. घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन चोरी केल्याचे दिसून येते. तसेच पोलिसांचा जळगाव जिल्ह्यात धाक उरलेला नाही. चोऱ्या, दरोडा, असे प्रकार सातत्याने होत असल्याचे सांगत त्यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर सडकून टिका केली.



