उद्या ‘या’ जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी…

mumbai – राज्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. मुंबई सह सर्वत्र रस्ते जलमय झाले आहेत. तसेच भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि इतर जिल्ह्यांना मंगळवारी (१९ ऑगस्ट २०२५) मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पालघर, मीरा भाईंदर, पनवेल आणि रायगड या भागातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनांनी घेतला आहे.
मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या म्हणजेच १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी असणार आहे. भारतीय हवामान खात्याने उद्या मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील म्हणजेच मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

नवी मुंबई शहरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता नवी मुंबई आणि पनवेल क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ खासगी अनुदानित/ विना अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे. तसंच नवी मुंबई महानगरपालिकेने आज सुद्धा पावसामुळे शाळेला सुट्टी जाहीर केली होती.

ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच हवामान खात्याने दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. उद्या ठाणे आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील शाळांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मीरा भाईंदर पालिका हद्दीतही मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमधील प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.