एकात्मता आणि लोकहिताची दहीहंडी…

श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीला मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्णाच्या हातून कंसाचा वध होणार हे भाकीत आकाशवाणीतून वर्तवले गेले होते. त्यामुळे कंसाने आपल्या बहिणीला म्हणजे देवकीला पती वसुदेवासह कारागृहात ठेवले होते. कंस हा श्रीकृष्णाचा मामा होता. त्याने देवकी आणि वसुदेवांना कैदेत ठेवले होते. कंसाने भविष्यवाणी ऐकली होती की, देवकीचा मुलगा त्याचा वध करेल, त्यामुळे त्याने देवकीच्या प्रत्येक मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. पण, कृष्णाचा जन्म झाला आणि त्याला गोकुळात पाठवण्यात आले. मोठे झाल्यावर कृष्णाने मथुरेला जाऊन कंसाचा वध केला आणि आपल्या आई-वडिलांना आणि मथुरेतील लोकांना कंसाच्या अत्याचारातून आणि भीतीतून मुक्त केले.
दरम्यान, याच गोकुळात असताना श्रीकृष्णाने काही बाललीला केल्या. त्यामध्ये छतावर टांगलेल्या दही दुधाच्या घागरी फोडून त्यातले दही दूध चोरून घेण्याची लीला कृष्ण करत असे. कृष्ण आपल्या बाळ गोपाळांना दही दूध मिळावे या हेतूने छोटी हंडी करून म्हणजे मुलांचे दोन-तीन थर लावून हंडी करत असे. आणि मिळालेले दही सर्व मुलांमध्ये वाटून खात असे. या क्रियेतच कृष्णाचे एकात्मता आणि लोकहित लपल्याचे दिसून येते. आपण गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी करतो. ही हिंदू धर्माची मोठी परंपरा आहे संपूर्ण भारतात गोकुळाष्टमी नंतर हंडी फोडण्याचा रिवाज आहे. श्रीकृष्ण देवता ही हिंदुत्वाची सर्वात लाडकी देवता आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहात हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा भारतात सर्व प्रांतात होत असतो.
सुरवातीच्या काळात दहहंडी केवळ दोन तीन थरात लावली जायची पण जसजसा काळ उलटत गेला तसतसे लोकांमध्ये या दहहंडीचा उत्साह वाढत गेला. ठिकठिकाणी जागोजागी गल्ली बोळातून दहीहंडीचा सण आज मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. लहान, मोठे, थोर मंडळी, अगदी महिला देखील मनोभावे, आनंद, उत्साहाने या सणात सहभागी होत आहेत. आता तर दहहंडीचे एक दोन थर नव्हे तर अगदी दहा अकरा थर लावणारे गोविंदा पथक देखील आहेत. काही ठिकाणी तर महिलांचे गोविंदा पथक आहेत. आता तर या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देखील प्राप्त झाला आहे. नेते, कलाकार मंडळी देखील या दहहंडीच्या सोहळयात आवर्जून उपस्थित राहतात. हळूहळू या उत्साहाला आता स्पर्धेचे स्वरूप देखील प्राप्त झाले आहे.
दरम्यान, सण नक्कीच साजरे करावे पण त्यात जीवाला धोका निर्माण होईल अशी कोणतीच कृती नको. त्यामुळे गोविंदा पथकाने नक्कीच याचा विचार करावा आणि दहीहंडीचा सण साजरा करत असताना, थर लावत असताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आपली देखील आणि आपल्या बाजूला असलेल्या व्यक्तीची देखील. उत्साह, आनंद, मजा करण्याच्या नादात शरीराला कोणतीही इजा होईल किंवा शरीराचे नुकसान होईल असे होऊ नये याची काळजी घ्यावी. तरच आपण एकात्मता आणि लोकहिताची दहीहंडी साजरी केली असे म्हणता येईल.