जुन्या वर्सोवा पुलावर भीषण अपघात…

mumbai – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा पुलावर टँकर खाडीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. आज दुपारच्या सुमारास हि घटना घडली. एक भरधाव टँकर लोखंडी ग्रीलचा कठडा तोडत थेट खाडीत कोसळला. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर टँकर पाण्यात बुडाला.
माहितीनुसार, हा टँकर वसईहून ठाण्याकडे जात होता. गुजरातहून मुंबईकडे जाणा-या लेन वर ही घटना घडली. टॅंकरने प्रथम लाकडाने भरलेल्या टेलरला मागून धडक दिली आणि त्यानंतर ड्रायव्हरने स्टेअरिंग वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण सुटल्याने टँकर पुलाच्या कठड्याला धडकून खाली खाडीत कोसळला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, क्रेनच्या सहाय्याने टँकर उचलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.