केडीएमसीच्या फेरीवाला पथक प्रमुखाचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल; कारवाईची मागणी…

kalyan – केडीएमसी ४ जे प्रभाग कार्यलयाच्या आवारात केडीएमसी फेरीवाला पथक प्रमुखाचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भगवान पाटील असे याचे नाव असून, या प्रकरणाची राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल प्रकाश काटकर यांनी केडीएमसी आयुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत भगवान पाटील आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ४ ‘जे’ प्रभाग क्षेत्र अंतर्गत असलेल्या क.म.डो.पा. कर्मचारी आणि प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांद्वारे होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करीत आहे.
माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार, क.म.डो.पा. कर्मचारी भगवान पाटील हे अवैध फेरीवाल्यांकडून पैसे घेऊन त्यांना धंदा लाऊन देतात. हे प्रत्येक फेरीवाल्यांकडून ५०० ते १००० रुपये घेत असल्याचे समोर आले आहे. तसेच, या कामामध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी देखील सहभागी असून या भ्रष्टाचारात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. असे काटकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
त्यामुळे क.म.डो.पा. ४ जे’ प्रभाग क्षेत्र अधिकारी व कर्मचारी भगवान पाटील यांना फेरीवाल्यांकडून अवाजवी पैसे उकळत असल्याबाबत त्वरीत निलंबित करण्यात यावे. तसेच क.म.डो.पा. जे प्रभाग क्षेत्र अधिकारी व कर्मचारी भगवान पाटील आणि संबंधित सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध फेरीवाल्यांकडून बेकायदेशीर पद्धतीने पैसे घेतल्याप्रकरणी चौकशी करीत गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, केडीएमसी हद्दीत असे अवैध फेरीवाले फुटपाथ, रस्त्यावर अनेक ठिकाणी, जास्त करून स्टेशन परिसरात आपले ठाण मांडून बसलेले असतात. शिवाय फुटपाथवर अवैधरित्या टपऱ्या उभारतात. डोंबिवली तर अतिक्रमण विभागाची गाडी ज्या ठिकाणी असते त्याठिकाणी हे फेरीवाले बिनधास्तपणे व्यवसाय करताना दिसून येतात.
याबाबत वारंवार अनेकांनी केडीएमसीकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत. तरीहि या फेरीवाल्यांवर कारवाई होताना दिसत नाही. माजी आमदार राजू पाटील यांनी अवैध फेरीवाल्यांविरोधात वारंवार आवाज उठवला तरीही एकही फेरीवाला हटवलेला नाही उलट या अवैध फेरीवाल्यांची दिवसेंदिवस वाढ होत आहे.
त्यामुळे केडीएमसी फेरीवाला पथक प्रमुखाचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या फेरीवाल्यांना पैसे द्या आणि बिन्धास्त अवैध व्यवसाय करा आम्ही तुम्हाला पाठबळ देतो असे सांगण्यात येत आहे कि काय अशी शंका आता निर्माण होत आहे.
काही दिवसांपूर्वीच केडीएमसी लिपिक प्रशांत धीवर यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. त्यावेळी प्रशांत धीवर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेल्या जबानीत आपण हि लाच सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आणि उपायुक्त अवधूत तावडे यांच्यासाठी स्वीकारल्याचे सांगितले होते. परंतु त्यानंतर याबाबत काय चौकशी करण्यात आली याची कोणतीच माहिती समोर आलेली नाही. याउलट कर्मचाऱ्यांचे पैसे घेतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावरून अशा गंभीर प्रकारणाची केडीएमसी किती गांभीर्याने दखल घेते हे दिसून येत आहे.
तसेच हे फेरीवाले केडीएमसी आयुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी यांच्या आशीर्वादाने व्यवसाय करत आहेत कि काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे याची तात्काळ दखल घेऊन स्टेशन परिसर व इतर अवैध ठिकाणी असलेले फेरीवाले, हातगाड्या, फुटपाथवरील अवैध टपऱ्या हटवण्यात याव्या अशी मागणी होत आहे.