राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची होणार आरोग्य तपासणी…

pune – राज्य शासन प्रत्येक बालकांचे आरोग्य व उज्ज्वल भविष्याची जबाबदारी पूर्ण निष्ठेनी पार पाडेल; सर्वांनी मिळून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आयोजित विशेष तपासणी मोहीम यशस्वी करुया व या माध्यमातून प्रत्येक बालकाला सशक्त आणि निरोगी जीवनाची हमी देण्याचे काम करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथे आयोजित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ आणि राज्यस्तरीय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे (दूरदृष्यप्रणीलीद्वारे) तर व्यासपीठावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, शहरी आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत ६ हजार शाळांमधील १४ लाख विद्यार्थी आणि ३० हजार अंगणवाडीतील २० लाख बालकांची डोक्यापासून ते नखा पर्यत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तसेच यामाध्यमातून बालकांच्या आरोग्य विषयी माहिती मिळणार आहे. पहिल्याच टप्प्यात शारीरिक, मानसिक आजाराचे निदान होऊन त्यांच्यावर वेळेत मोफत उपचार करता येणार आहे, अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस श्री. पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
ते पुढे म्हणाले, बालकांचे आरोग्य एखाद्या कुटुंबापुरते मर्यादित नसून ते समाज, देशाच्या उज्ज्वल भविष्याकरीता महत्वाचे असते. त्यामुळे राज्यातील बालके सदृढ असली पाहिजे, त्याचे आरोग्य चांगले असले पाहिजे, अभ्यासात प्राविण्य मिळवले पाहिजे, यापद्धतीने सुदृढ व जबाबदार नागरिक घडविण्याचे काम केले पाहिजे. बालकांना जन्मजात कुपोषण, ॲनेमिया, डोळे व दाताचे आजार, हद्यरोग, कुष्ठरोग आदीप्रकारचे आजार असतात त्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते, या मोहिमेचा माध्यमातून अशा बालकांवर शासकीय रुग्णालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टराद्वारे वेळेत उपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने गरजू बालकांना मोठ्या प्रमाणावर याचा लाभ होणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक सेवा देण्याकरीता पुढे येत असून त्यांच्या सेवेचा लाभ गरजू नागरिकांना मिळण्याकरीता राज्यशासन प्रयत्नशील आहे. राज्यात महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लस देण्याबाबत राज्य शासन विचार करीत असून त्याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, असेही पवार म्हणाले.