बोलण्यात गुंतवून सोने लंपास…

डोंबिवली – बोलण्यात गुंतवून २ इसमांनी एका व्यक्तीची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी दोन्ही इसमांना अटक करून एकूण १,४७,५००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. मेहमुद अस्लम शेख आणि आयुब ताज शेख अशी या दोघांची नावे आहेत.
फिर्यादी हनुमंत गोसावी कल्याण रोड वरील मेडीकल स्टोअर्सला पायी जात असताना २ अनोळखी इसमांनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या सोन्याच्या अंगठीत काहीतरी दोष आहे तो दोष काढण्यासाठी हातातील अंगठी दाखवा, अंगठीतील दोष काढावा लागेल असे सांगून त्यांची १८,०००/- रू. किंमतीची ३ ग्रॅम वजनाची, सोन्याची अंगठी घेऊन गेले असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, गॉगल, स्कुटर असा एकूण २३,७००/- रू. चा मुद्देमाल तसेच ३ सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याची चैन असा एकूण ३८ ग्रॅम वजनाचा १,२३,८००/- रू किंमतीचा सोन्याचा ऐवज एकूण १,४७,५००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून २ गुन्हे उघडकीस आणले.
सदरची यशस्वी कामगिरी वपोनि सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि बळवंत भराडे, पोहवा सुनिल भणगे, पोहवा सचिन भालेराव, पोहवा तुळशीराम लोखंडे, पोहवा रविंद्र कर्पे, पोना हनुमंत कोळेकर, पोअं शिवाजी राठोड यांनी केली.