कोल्हापुरात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त…
kolhapur – विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 कडून वाहनासह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये इतकी आहे.
जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 ला राधानगरी – कोल्हापूर रोडवरुन एका चारचाकी वाहनातून अवैध गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या पथकाने कोल्हापूर-राधानगरी रोड, क्रशर चोक, इरानी खान रंकाळा तलाव जवळ, कोल्हापूर शहर येथे सापळा लावून पाळत ठेवली असता एक संशयित इसम चारचाकी घेऊन येत असलेला दिसला. या वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील हौदामध्ये गोवा राज्य निर्मित, गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेले व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्य व बिअर ने भरलेले विविध ब्रँडचे 180, 500 तसेच 750 मिलीचे एकुण 151 बॉक्स आढळून आले.
या प्रकरणी प्रसाद महादेव नराम या व्यक्तीस अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या गाडीत मध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य व बिअर चा मद्यसाठा आढळून आला. अटक केलेल्या व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंदर्भातील पुढील तपास सुरु आहे.